गोवा - पणजीसह तिसवाडी आणि फोंडा तालुक्यांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटून ६ दिवस उलटले तरीही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे पणजीवासीयांना पाण्यासाठी अजूनही टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.
फोंडा तालुक्यातील खांडेपार येथून पणजीच्या दिशेने येणारी जलवाहिनी गुरूवारी (15) सकाळी पाचच्या दरम्यान फूटली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तत्काळ दुरुस्तीच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या होत्या. त्यानूसार कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु, या जलवाहिनीच्या सभोवती असलेला मातीचा भराव मुसळधार पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे, त्यासाठी नव्याने सिमेंटचा पाया उभारावा लागला. पावसाने उघडीप दिल्याने काम करणे सुलभ झाले तरीही मंगळवार संध्याकाळपर्यंत ते आटोक्यात आले नव्हते. सोमवारी रात्री वेल्डिंगचे सुमारे 40 टक्के काम अपूर्ण होते. सदर कामाला मंगळवारी सकाळी सुरूवात करण्यात आली.