भोपाळ - मध्यप्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. ३ नोव्हेंबरला २८ जागांसाठी मतदान होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांची एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे. नुकतेच काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना 'श्वान' असे संबोधले होते, त्याला सिंधिया यांनी उत्तर दिले आहे.
ज्योदिरादित्य सिंधिया सभा काय म्हणाले सिंधिया?
कमलनाथ यांच्यावर टीका करताना सिंधिया म्हणाले, 'कमलनाथजी मला श्वान म्हणाले, होय मी श्वान आहे, आणि जनतेचा सेवक आहे. श्वान त्याच्या मालकाचे रक्षण करतो. जर कोणी घोटाळे करत असेल आणि वाईट हेतू ठेवून योजना आखत असेल, तर हा श्वान त्या व्यक्तीवर हल्ला करेल, असे सिंधिया अशोकनगर जिल्ह्यातील शदोरा येथे रॅलीला संबोधित करताना म्हणाले.
अटीतटीची निवडणूक
मध्यप्रदेशात विधानसभेच्या २८ जागांसाठी ३ नोव्हेंबरला पोटनिवडणुका होणार आहेत. भाजपाला बहुमतासाठी आठ जागा हव्या असल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या वर्षाच्या सुरुवातीला काँग्रेस पक्षातून बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत २० पेक्षा जास्त आमदारांनी पक्ष सोडला होता. त्यानंतर कमलनाथ यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकार कोसळले. राजकीय उलथापालथ झाल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सत्तेत आली. त्यामुळे आता भाजपा सरकार खाली खेचण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे.