श्रीनगर :काश्मीरमध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यामधील एक दहशतवादी काश्मीरचा तरुण होता. चकमकीपूर्वी त्याचे वडील त्याला शरण येण्यासाठी विनवणी करत होते. मात्र, त्यांचे म्हणणे ऐकण्यास त्याने नकार दिला, ज्यामुळे त्याला आपले प्राण गमवावे लागले. हिलाल अहमद असे या तरुणाचे नाव होते. तो काही दिवसांपूर्वीच हिजबुलमध्ये सहभागी झाला होता.
या वडिलांची आर्जवे कॅमेऱ्यात कैद झाली असून, हा व्हिडिओ आता व्हायरल होतो आहे. यामध्ये हिलालचे वडील त्याला अनेकवेळा शरण येण्यासाठी विनंती करत आहेत. "हिलाल, मी तुझा बाप आहे. हे साहेब (लष्करी अधिकारी) माझ्यासोबतच आहेत. जर तू आमचे ऐकलेस तर तुला काहीही होणार नाही, आणि मी तुला वाचवू शकेल." असे ते वारंवार त्याला सांगत होते.