नवी दिल्ली - इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी आणि एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या मध्ये काहीही फरक नाही, असे वक्तव्य शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केले आहे. ओवैसी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती, त्या पार्श्वभुमीवर रिझवी यांनी हे वक्तव्य केले आहे.
वसीम रिझवी यांनी नुकतेच राम मंदिराच्या उभारणीसाठी ५१ हजार रूपयांची देणगी जाहीर केली आहे. बगदादीकडे शस्त्रास्त्रे आणि स्फोटके आहेत, तर ओवैसी भाषणांद्वारे दहशत पसरवत आहे. ओवैसी मुस्लिमांना दहशतवाद आणि रक्तपाताकडे ढकलत असल्याचे ते म्हणाले. तसेच ओवैसींवर बंदी घालण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील वादग्रस्त जमीन राम मंदिराला देण्याचा निर्णय घेतल्यावरुन ओवैसींनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च असू शकते मात्र, अचूक नाही असेही ते म्हणाले होते. ओवैसींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरदेखील टीका केली होती. आपला देश हिंदू राष्ट्राकडे वाटचाल करत आहे, असे म्हणत भविष्यात समान नागरी कायदा आणला जाईल असेही मत त्यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती.