ग्वालियर - राज्यात 28 जागांसाठी पोटनिवडणूक होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस नेते सचिन पायलट हे काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत. प्रचारासाठी सचिन पायलट मध्य प्रदेशच्या प्रचार दौऱ्यावर आले असून ते भाजपा खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याविरोधात प्रचार सभा घेणार आहेत. यावेळी पत्रकारांकडून त्यांना ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या पक्षांतरावर प्रश्न विचारण्यात आले.
काँग्रेस पक्ष ज्योतिरादित्य सिंधिया यांना गद्दार असे संबोधित करत आहे. यावर तुमचे काय मत आहे, असा सवाल पायलट यांना विचारण्यात आला. त्यावर सचिन पायलट म्हणाले, की कोणत्या पक्षात रहायचे हे, निवडण्यासाठी प्रत्येक जण स्वतंत्र आहे. शेवटी कोण बरोबर आणि कोण चुकीचे हे जनता ठरवते.
पायलट करणार सिंधियांविरोधात प्रचार -
काँग्रेसच्या प्रचारासाठी पायलट यांची एन्ट्री झाल्याने उत्तर प्रदेशच्या पोट निवडणुकीला एक नवे वळण आले आहे. सिंधिया आणि पायलट दोघेही जुने मित्र आहेत. हे दोघेही काँग्रेसचे तरुण चेहरे राहिले आहेत. यावर्षी मार्चमध्ये सिंधिया यांनी समर्थक आमदारांसह भाजपामध्ये प्रवेश केला. यामुळे कमलनाथ यांचे काँग्रेस सरकार कोसळले. दुसरीकडे, राजस्थानातील सचिन पायलट यांनी अशोक गेहलोत सरकारच्या विरोधात असेच प्रयत्न केले होते. मात्र, त्यात पायलट यशस्वी होऊ शकले नाहीत. यातच आता पायलट काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून सिंधिया यांच्या बालेकिल्ल्यात प्रचार करीत आहेत.
सिंधिया आणि पायलट यांची भेट -
सचिन पायलट मध्य प्रदेशच्या प्रचार दौऱ्यावर आले आहेत. तेव्हा भाजपा खासदार ज्योतिरादित्य सिंधिया आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची ग्वालियरमध्ये भेट झाली. याची माहिती खुद्द सिंधिया यांनी दिली. भेटीनंतर सिंधिया भोपालसाठी रवाना झाले. तर पायलट ग्वालियरमध्ये दाखल झाले. तर प्रचार सभेत पायलट आणि सिंधिया दोघेही एकमेकांचे नाव घेणं अद्याप टाळत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात 28 विधानसभा जागांवर 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुका होणार आहेत.