कामां (भरतपूर) -जिल्ह्यातील कामां येथील धर्मशाला या गावातील ग्रामस्थांनी पोलिसांवर हल्ला केला. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. यानंतर गावात तणाव निर्माण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलिस दल तैनात करण्यात आले. तसेच, पोलिसांनी त्यांच्यावर दगडफेक करणाऱ्या लोकांनाही अटक केली आहे.
भरतपूरमध्ये ग्रामस्थांची पोलिसांवर दगडफेक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धर्मशाला गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून दोन गटांमध्ये जोरदार वाद सुरू आहे. यामध्ये झालेल्या हाणामारीत एक युवक जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांना सुपूर्द केला होता. यानंतर रविवारी सायंकाळी युवकाच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृतदेहावर अग्निसंस्कार केले.
पोलिसांवर दगडफेक
सोमवारी मृत युवकाच्या नातेवाईकांनी दुसऱ्या गटातील लोकांच्या घरी जाऊन लुटालूट आणि तोडफोड केली. याची माहिती मिळताच कैथवाडा ठाण्यातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. येथे ग्रामस्थांनी पोलिसांवरच हल्ला केला. यानंतर पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून घेतली. मात्र, लोक त्यांच्यावर दगडफेक करत होते.
या प्रकारानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक लाल मीणा, कामा येथील जिल्हा पोलीस अधीक्षक देवेंद्र सिंह राजावत, डीग येथील जिल्हा पोलीस अधीक्षक मदनलाल यांच्यासह संपूर्ण डीग सेक्टरमधील सर्व पोलीस ठाण्यांमधील पोलीस आणि क्यूआरटी टीम घटनास्थळी पोहोचले. येथे यानंतर पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या सर्वांना अटक करण्यात आली. तसेच, लुटालूट केलेले साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले.