चेन्नई : चांद्रयान-२ मधील विक्रम लँडर हे चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटरवर असताना त्याच्याशी संपर्क तुटला होता. त्यामुळे त्याचे नियोजित सॉफ्ट लँडिंग करता आले नाही. मात्र, चंद्राच्या पृष्ठभागावर आदळल्यानंतरही हे लँडर सुस्थितीत आहे. ते थोड्या तिरक्या अवस्थेत पडले आहे, मात्र त्याच्या कोणत्याही भागाला इजा झाली नसल्याचे इस्रोच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
तसेच, ऑर्बिटरने घेतलेल्या छायाचित्रांवरुन, विक्रम लँडर हे त्याच्या नियोजित लँडिंगच्या जागेपासून अवघ्या काही अंतरावर असल्याचेही स्पष्ट होत आहे. विक्रमशी संपर्क साधण्याचा इस्रो कसोशीने प्रयत्न करत असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
आम्ही १४ दिवस विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. वरकरणी पाहता विक्रम सुस्थितीत दिसत आहे. मात्र, आतल्या बाजूने काही नुकसान झाले असल्यास, संपर्क साधला जाण्याची शक्यता अगदी कमी आहे. याआधी इस्रोने पृथ्वीबाहेरच्या कक्षेत संपर्कातून बाहेर गेलेल्या अवकाशयानाशी पुन्हा संपर्क साधला होता. मात्र, यावेळी परिस्थिती वेगळी आहे. विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचले आहे. त्यामुळे, तशा प्रकारचा प्रयोग याबाबतीत होऊ शकत नाही, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
'विक्रम' हे तिरक्या अवस्थेत, मात्र सुस्थितीत - इस्रो - Vikram
चांद्रयान-२ चे विक्रम लँडर हे लँडिंगनंतर तिरक्या अवस्थेत आहे. मात्र, सुदैवाने त्याला कोणतेही नुकसान झाले नसून, ते सुस्थितीत असल्याचे इस्रोने स्पष्ट केले. तसेच, त्याच्या नियोजित लँडिंगच्या जागेपासून ते अवघ्या काही अंतरावर असल्याचे ऑर्बिटरने घेतलेल्या छायाचित्रांमधून स्पष्ट होत आहे.
Chandrayaan-2