नवी दिल्ली -ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतेच रिलीज झालेल्या व्हर्जिन भास्कर या वेब सिरिजमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे अपमानित दृश्य आणि आवाज वापरण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांच्या हस्तक्षेपानंतर हा भाग त्यातून कापण्यात आला आहे. परंतु ज्या प्रमाणे मालिका आणि चित्रपटासाठी सर्टीफिकेट देण्याचे महामंडळ आहे. तसे महामंडळ वेबसिरीजसाठी नाही. तरी त्याच्यावर बंधने आणण्यासाठी संसदेने कायदा करावा, असे मत भाजपचे राज्यसभा सदस्य विकास महात्मे यांनी आज राज्यसभेत मांडले.
वेबसिरीजला सेन्सॉर करण्यासाठी संसदेने कायदा करावा - डॉ. विकास महात्मे - rajysabha latest news
व्हर्जिन भास्कर या वादग्रस्त वेवसिरीजवरुन भाजपचे राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे यांनी वेबसिरीजवर कायदा करण्यासाठी राज्यसभेने कायदा संमत करावा अशी भूमिका आज मांडली.
डॉ. महात्मे यावेळी बोलताना म्हणाले, की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सर्व भारतीयांसाठी आदर्श व्यक्तिमत्व आहे. अशा व्यक्तिमत्वाचा अपमान करणे म्हणजे भारतीयांच्या भावना दुखावणे होय. तरी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंधने नसल्याने यातील सिरीजमध्ये अश्लील दृश्यांचा भडिमार असतो. तरी यापुढे कोणीही निर्माता वेबसिरीजच्या माध्यमातून कोणत्याही महापुरुषांचा अवमान करु नये, यासाठी याबर बंधने घालण्यासाठी कायदा तयार करावा. जेणे करुन त्यांचे सेन्सॉर झाल्याशिवाय ते प्रदर्शित करता येणार नाही.