नवी दिल्ली - कुख्यात गुंड विकास दुबे ठार झाल्यानंतर पोलीस आज (शनिवार) पुन्हा एकदा कानपूरमधील बिकारू गावात गेले आहेत. पोलिसांसोबत शीघ्र कृती दलाचे जवानही आहेत. पोलिसांवर केलेल्या चकमकीनंतर त्यांची शस्त्रे पळवून नेण्यात आली होती. ही शस्त्रे ताब्यात घेण्यासाठी पोलीस गावात गेले आहेत.
2 जुलैच्या रात्री पोलिसांचे पथक विकास दुबेला अटक करण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. त्यावेळी नियोजनपूर्वक केलेल्या गोळीबारात आठ पोलीस ठार झाले. तर सातजण जखमी झाले. यावेळी पोलिसांची शस्त्रे विकास दुबेच्या साथीदारांनी किंवा गावकऱ्यांनी पळवून नेल्याचे बोलले जात आहे. ही गहाळ शस्त्रे जप्त करण्यासाठी पोलीस बिकारू गावात गेले आहेत. लुटण्यात आलेल्या शस्त्रामध्ये इन्सास रायफल आणि एके- 47 सारख्या बंदुकांचाही समावेश आहे.
गावकऱ्यांना दिला इशारा
जर कोणी पोलिसांची शस्त्रे घेतली असतील तर 24 तासाच्या आत जमा करा, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जा , असा इशारा पोलिसांनी गावकऱ्यांना दिला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गावकऱ्यांसोबत बैठकाही घेतल्या. तणाव निवळण्यासाठी मोठा फौजफाटाही बिकारु गावात तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर विकास दुबे साथीदारांसह पळून गेला होता. आठ दिवस पोलीस त्याच्या मागावर होते. शेवटी मध्यप्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. तेथून कानपूरला आणत असताना पोलिसांच्या एका गाडीचा अपघात झाला. या संधीचा फायदा घेऊन विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचे शस्त्र हिसकाऊन घेत त्याने गोळीबारही केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात विकास दुबे ठार झाला. ही चकमक बनावट असल्याचा आरोप आता उत्तर प्रदेश पोलीस आणि राज्य सरकारवर होत असून विरोध आक्रमक झाले आहेत.