नवी दिल्ली -काँग्रेसचे जेष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचं निधन झाल्याचं समोर आलं आहे. दीर्घ आजाराने वयाच्या 93 व्या वर्षी व्होरा यांनी अखेरचा श्वास घेतला. यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या खास मर्जीतील नेते, अशी व्होरा यांची ओळख आहे. काँग्रेसचा चाणक्य आणि पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे खास मानले जाणारे अहमद पटेल यांच्या मृत्यूनंतर मोतीलाल व्होरा यांचे निधन झाल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
राजस्थानच्या नागौरमध्ये जन्म -
मोतीलाल व्होरा यांचा जन्म 20 डिसेंबर 1928 ला राजस्थानच्या नागौरमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव मोहनलाल व्होरा आणि आईचे अंबा बाई आहे. त्यांचा विवाह शांति देवी यांच्याशी झाला होता. त्यांना चार मुली आणि दोन मुले आहेत. त्यांचा एक मुलगा अरुण व्होरा हे दुर्ग येथून आमदार आहेत.
पत्रकारिता ते राजकारण -
मोतीलाल व्होरा हे पत्रकार म्हणून कार्यरत होते. अनेक वर्षे त्यांनी पत्रकारिता केली. मोतीलाल यांनी 1968 मध्ये राजकारणात प्रवेश केला. व्होरा 1968 मध्ये समाजवादी पक्षाचे सदस्य होते. त्यानंतर ते दुर्ग म्युनिसिपल कमेटीचे सदस्य बनले. 1972 मध्ये त्यांनी पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली व आमदार बनले. 1972 ते 1990 या कालावधीत ते सहावेळा मध्य प्रदेशमध्ये आमदार होते. त्यावेळी ते अर्जुन सिंह यांच्या मंत्रिमंडळात मध्यप्रदेशचे शिक्षण मंत्री बनले. व्होरा दोन वेळा (1985 ते 1988 आणि जानेवारी 1989 ते डिसेंबर 1989) पर्यंत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर 1993 ते 1996 पर्यंत ते उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते. त्यानंतर 1998 मध्ये 12 व्या लोकसभेसाठी त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली. 2000 ते 2018 पर्यंत ते अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीचे कोषाध्यक्ष होते.