गुवाहाटी - वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिला आपल्या क्षमता तपासून पाहत आहेत. याचेच एक उदाहरण आसामच्या दिब्रुगड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. दिब्रुगडमध्ये फक्त महिलांकडून चालवला जाणारा एक भाजीपाला बाजार आहे. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच भाजीपाला बाजार आहे.
जिल्ह्यातील विविध महिला बचत गटांतील महिलांनी एकत्र येऊन हा बाजार सुरू केला आहे. स्वत:च्या शेतात पिकवलेला भाजीपाला, फळे आणि मत्स्यशेतीतील मासे घेऊन या महिला बाजारात विक्रीसाठी येतात. सध्या या बाजारात 22 महिला विक्रेता म्हणून सहभाग घेत आहेत. बुधवारी आणि शनिवारी असे आठवड्यातील दोन दिवस हा महिलांचा भाजीपाला बाजार भरतो. सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत महिला भाजी विक्री करतात.