जयपूर- राजस्थानमधील सत्तानाट्याचा नवा अंक गुरुवारी समोर आला आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीने भाजप नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी अशोक गेहलोत यांच्या सरकाला पाठिंबा देण्याबद्दल विचारणा केली, असा आरोप केला आहे. या पक्षाचे अध्यक्ष हनुमान बेनिवाल यांनी गुरुवारी #गेहलोत_वसुंधरा_गठजोड असे ट्विटर कॅम्पेन चालवले.
राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे अध्यक्ष हनुमान बेनिवाल यांनी '#गेहलोत_वसुंधरा_गठजोड' या हॅशटॅगने ट्विटर कॅम्पेन चालवले, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी वसुंधराराजे यांनी काँग्रेस आमदारांना फोन करुन अशोक गेहलोत सरकारला पाठिंबा देण्याबद्दल विचारणा केल्याचा आरोप केला आहे. यामध्ये बेनिवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि राजस्थान भाजपला टॅग केले आहे.