नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय नेमबाज वर्तिका सिंह यांनी गृहमंत्री अमित शाह यांना आपल्या रक्ताने पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या चार जणांना एका महिलेने फाशी द्यावी, असे लिहिले आहे. तसेच मी स्वत: दोषींना फाशी देऊ ईच्छित असल्याचं तिने म्हटले आहे.
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना एका महिलेकडून फाशी देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र वर्तीका सिंह यांनी अमित शाहांना लिहले आहे. महिलांनी दोषींना फाशी दिली तर एक स्त्रीसुद्धा फाशी देऊ शकते, असा संदेश देशभर जाईल. मला आशा आहे की, यामुळे समाजात बदल घडून येईल. या मागणीला महिला कलाकार, खासदारांनी पाठिंबा द्यावा, असे वर्तिका यांनी म्हटले आहे.
निर्भया प्रकरणातील गुन्हेगार दिल्लीच्या तिहार तुरुंगात कैदेत आहेत. चारही गुन्हेगारांच्या फाशीची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक वॉरंट जारी करण्याच्या याचिकेवर 18 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या आरोपींना फाशी शिक्षा सुनावल्यापासून अडीच वर्षे लोटली आहेत. 'दोषींची पुनरावलोकन याचिका फेटाळल्यापासून १८ महिने होऊन गेले आहेत. त्यामुळे आता या गुन्हेगारांना तत्काळ फाशी द्यावी', अशी मागणी निर्भयाच्या आईने केली आहे.
दरम्यान तिहार तुरुंगात असलेले चारही आरोपी सध्या तणावाखाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. चारही आरोपींनी खाणे-पिणे कमी केले आहे. तुरुंगातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. प्रत्येक दोषीसोबत चार ते पाच सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. सध्याची संवेदनशील स्थिती पाहता या दोषींनी परस्पर स्वतःचे बरे-वाईट करून घेऊ नये आणि त्यांना कायदेशीर प्रक्रियेद्वारेच शिक्षा मिळावी, यासाठी अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.