नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून बंद असलेली नवी दिल्ली ते वैष्णवदेवी (कटरा, जम्मू काश्मीर) धावणारी वंदे भारत एक्सप्रेस परत सुरू करण्यात येणार आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून वंदे भारत एक्सप्रेस पुन्हा धावणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेस' 15 ऑक्टोबरपासून पुन्हा धावणार रेल्वे प्रवाशांनी वंदे भारत एक्सप्रेसला पंसती दिली आहे. ही एक्सप्रेस पुन्हा सुरु करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. म्हणून, रेल्वे प्रवाशांना सुविधा देण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येत आहे, असे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी सांगितले.
वंदे भारत एक्सप्रेस मंगळवार वगळता, इतर सर्व दिवशी सकाळी 6 वाजता नवी दिल्ली येथून प्रस्थान करेल. तर दुपारी 2 वाजता वैष्णवदेवी (कटरा, जम्मू काश्मीर) येथे पोहचेल. तसेच दुपारी 3 वाजता वैष्णवदेवी कटारा येथून निघेल. तर रात्री 11 वाजता दिल्लीला पोहचेल. या रेल्वेमुळे दिल्ली ते वैष्षवदेवी मधील अंतर 4 तासांनी कमी झाले आहे.
फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली आणि वाराणसीदरम्यान वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेला हिरवा कंदील दाखविला होता. या रेल्वेची संरचना आणि निर्मिती चेन्नईच्या उत्पादन प्रकल्पात करण्यात आली आहे. पूर्णपणे देशात तयार झालेल्या रेल्वेत 30 टक्के इलेक्ट्रिक उर्जेची बचत करणे शक्य होते.