खातिमा- भारत - नेपाळ सीमेवरील निर्मनुष्य भाग ठरवण्यात आलेल्या ठिकाणी अतिक्रमण करत कुंपण तयार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेपाळी नागरिकांना भारताच्या सशस्त्र सीमा बलाने रोखले. नेपाळी नागरिक मद्यधुंद अवस्थेत होते. सीमेवर असणाऱ्या 'पिलर क्रमांक 811' जवळ बुधवारी दुपारी हा प्रकार घडला.
नेपाळी नागरिकांच्या हालचालींची माहिती मिळताच सशस्त्र सीमा बल आणि पोलीस तेथे दाखल झाले. नेपाळी नागरिकांना सीमेवरुन परत जाण्यास सांगितले. यानंतर नेपाळच्या नॅशनल आर्म पोलीस फोर्सचे जवान दाखल झाले. सशस्त्र सीमा बल आणि नॅशनल आर्म पोलीस फोर्सने बराच वेळ समजवल्यानंतर ते नागरिक परत गेले. या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी सशस्त्र सीमा बल आणि नेपाळ नॅशनल आर्म पोलीस फोर्स यांच्यात बैठक होणार आहे.