डेहराडून -उत्तराखंड राज्याची देवभूमी ही ओळख माहीत आहे. मात्र, या राज्याची एवढीच ओळख नसून शहीद जवानांच्या धाडसी आणि पराक्रमी त्यागामुळे 'वीरभूमी' म्हणून राज्याची दुसरी ओळख आहे. कारगील युद्धात भारताचे ५२६ जवान हुतात्मा झाले होते. त्यातील एकट्या उत्तराखंड राज्यातील ७५ जवानांनी युद्धात आपल्या प्राणांची आहुती दिली होती.
दोन दशकांपूर्वी (१९९९) झालेले कारगील युद्ध ३ महिने सुरू होते. त्यानंतर २६ जुलै हा दिवस उजाडला आणि पाकिस्तानला भारतासमोर झुकावे लागले. पाकिस्तानला नेस्तनाबूत केलेल्या या युद्धात भारताने ५२६ जवान गमावले होते. 'ऑपरेशन विजय' यशस्वी करून दाखवणाऱ्या हुतात्मा जवानांमध्ये उत्तराखंड राज्यातील तब्बल ७५ जवान शहीद झाले होते. आजही राज्यातील नागरिक हळहळ व्यक्त करतात.