देहराडून -उत्तराखंडच्या पिठोरगड जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीने कोरोनाच्या भीतीने आत्महत्येचा प्रयत्न केला. तो पिठोरगडच्या बैरिनागमधील एका पशूवैद्यकीय रुग्णालयात कार्यरत आहे.
जीवन सिंह (४५) असे या व्यक्तीचे नाव आहे. बैरीगडमधील गंगोलीहाट पोस्ट ऑफिसजवळच्या कॉलनीमध्ये आपल्या कुटुंबासोबत ते राहतात. गेल्या तीन दिवसांपासून ते घसा दुखत असल्याची तक्रार करत असल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली.
त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी रुग्णालयातून घरी परतल्यानंतर जीवन यांनी स्वतःला आपल्या खोलीमध्ये बंद करून घेतले. त्यानंतर स्वतःच्या गळा कापून घेत त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. खोलीमधून आवाज आल्यामुले त्यांचे कुटुंबीय त्यांच्या खोलीपाशी पोहोचले. झालेला प्रकार समजताच तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.
सध्या जीवन यांना हल्दवानीच्या सुशीला तिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तसेच, त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, त्यांचा अहवाल आल्यानंतरच जीवन यांना खरेच कोरोनाची लागण झाली आहे, की नाही ते निष्पन्न होईल, असेही डॉक्टरांनी सांगितले.
हेही वाचा :देशभरात सुमारे 50 हजार नागरिकांची कोरोना चाचणी - आयसीएमआर