देहराडून :पतंजलीने 'कोरोनावरील औषध' म्हणून समोर आणलेल्या कोरोनीलसमोरील अडचणी वाढतच जात आहेत. आयुष मंत्रालायने फटकारल्यानंतर, आता उत्तराखंड आयुर्वेद विभागानेही या औषधाच्या दाव्याबाबत आपले हात वर केले आहेत. तसेच, विभागाचे परवाना अधिकारी वाय. एस. रावत यांनी आपण कंपनीला यासंदर्भात नोटीस पाठवणार असल्याचेही सांगितले आहे.
पतंजलीने आपल्या औषधाच्या उत्पादनासाठी आमच्याकडे अर्ज केला होता. त्यानुसार आम्ही त्यांना परवानगी दिली, त्यानंतर त्यांनी उत्पादन सुरू केले हे खरे आहे. मात्र, त्यांनी दाखल केलेल्या अर्जामध्ये कोरोना किंवा कोविड-१९चा कोठेही उल्लेख नव्हता. केवळ रोगप्रतिकार शक्ती वाढवणे, तसेच खोकला आणि तापावर औषध असा या अर्जात उल्लेख होता, त्यामुळे आम्ही परवानगी दिल्याचे रावत यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच, 'कोरोनील किट' बनवण्याची परवानगी त्यांनाकशी मिळाली, हे विचारणारी नोटीस आम्ही त्यांना पाठवणार आहे, असेही रावत यांनी सांगितले.