पणजी -दिवंगत मनोहर पर्रिकरांचे नाव राजकारणात ओढू नका, अशी विनंती त्यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पत्र लिहून केली आहे. नुकतेच पवार यांनी मनोहर पर्रिकरांवर भाष्य केले होते. त्यामुळे दुःखी होऊन उत्पल यांनी हे पत्र लिहिले आहे.
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर सर्व पक्ष दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचार करत आहेत. दरम्यान विविध पक्षाचे नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. त्यामध्ये शरद पवारही मागे नाहीत. त्यांनी मोठ मोठ्या सभांमध्ये राफेल प्रकरणावरून अनेकवेळा भाजपला धारेवधर धरले आहे. त्यात त्यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकरांवरही ताशेरे ओढले. पर्रिकरांनी राफेल प्रकरणामुळेच सुरक्षा मंत्र्याचे पद सोडले, पवारांच्या या वक्तव्यामुळे त्यांचा मुलगा दुखावला आहे.
उत्पल यांनी या प्रकारावरून शरद पवारांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. माझ्या वडीलांनी केंद्रीय सुरक्षा मंत्री असतानाही चांगले काम केले आणि गोव्यातही त्यांनी आपले काम पार पाडले. पर्रिकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर टीका करणे ही चांगली बाब नाही. हयात असताना त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. त्यावेळी ते उत्तर देण्यास सक्षम होते, असे उत्पल यांनी आपल्या पत्रातल लिहिले आहे.
माझ्या वडिलांनी आपल्या कारकिर्दीत उत्तम काम केले आहे. दरम्यान त्यांनी मोठ-मोठे निर्णय घेतले. त्यापैकी राफेल हाही एक आहे. त्याची किंमत ठरवण्यापासून तर अनेक महत्वाच्या वेळी त्यांनी देश कार्यात मदत केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे डाग लावता येत नाही, असे स्पष्टीकरणही उत्पल यांनी या पत्रात नमूद केले आहे.
पवार साहेब आपण दोनदा पर्रिकरांवर टीका केली. ही बाब चांगली नाही. आपण राजकीय फायद्यासाठी पर्रिकरांच्या नावाचा उपयोग करू नये, असा इशाराही उत्पल यांनी पत्राच्या माध्यमातून दिला आहे.