नवी दिल्ली -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर सायंकाळी राष्ट्रपती भवनाला सपत्नीक भेट दिली. राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ राष्ट्रपतींकडून रात्रीच्या जेवणाची मेजवानी आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी कोविंद यांच्या पत्नी सविता कोविंदही उपस्थित होत्या. स्नेहभोजनानंतर डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन अमेरिकेला जाण्यासाठी रवाना झाले.
तत्पूर्वी, राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींनी ट्रम्प यांची उपराष्ट्रपती व्यंकया नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर केंद्रीय मंत्र्यांशी ओळख करून दिली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचीही त्यांनी भेट घेतली. यावेळी स्नेहभोजनासाठी संगीतकार ए.आर रहेमान आणि शेफ विकास खन्ना हे देखील उपस्थित होते.