वॉशिंग्टन डी.सी - अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका अवघ्या चार दिवसांवर आल्या आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बायडेन आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहचला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडने फ्लोरिडात प्रचार सभा घेत असताना अचानक पाऊस आला. मात्र, त्यांनी भाषण सुरूच ठेवले. त्यामुळे नेटकऱ्यांना शरद पवारांच्या साताऱ्यातील वादळी सभेची आठवण झाली.
जो बायडेन ठरणार अमेरिकेचे शरद पवार?
मागीलवर्षी शरद पवारांनी साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीपूर्वी अशीच पावसात सभा घेतली होती. श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत अचानक पाऊस आला होता. मात्र, भरपावसात शरद पवासांनी सभा सुरू ठेवली होती. या सभेने अनेकांची मने जिंकली होती. टाळ्या वाजवून उपस्थितांनी पवारांना अभिवादन केले होते. या सभेचा प्रचारावर मोठा प्रभाव दिसून आला होता. या सभेनंतर उदयनराजेंचा पराभव होऊन राष्ट्रवादीने आपला बालेकिल्ला राखला होता. पवारांच्या पावसातील एका सभेने राजकीय गणित बदलले होते.
पवार पॅटर्न चालणार का?
त्यामुळे बायडेन यांची सभाही असाच करिष्मा करणार का? असे बोलले जात आहे. जो बायडेन यांनी सोशल मीडियावर पावसातील भाषणाचा फोटो शेअर केला आहे. 'वादळ जाईल आणि नवा दिवस येईल, असे कॅप्शन त्यांनी फोटोला दिले आहे. बायडेन यांच्या भाषणाची चर्चा अमेरिकेत सुरू आहे. सोशल मीडियावरील काहींनी या सभेनंतर शरद पवारांची आठवण काढली.