लखनऊ - संपूर्ण देश कोरोनाशी लढा देत असताना, उत्तर प्रदेशमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अलीगडमधील एका व्यक्तीचा क्षयरोगाने मृत्यू झाला आहे. या व्यक्तीवर वेळेत उपचार झाले असते, तर त्याचा जीव वाचला असता. मात्र, लॉकडाऊनमुळे त्याच्यावर उपचार होणे शक्य झाले नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यावेळी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहेत. त्यामुळे देशभरातील रुग्णालये सुरू असली, तरी वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे या रुग्णालयांपर्यंत पोहोचण्यासाठी रुग्णांना काहीही साधन उपलब्ध नाही असे चित्र दिसत आहे.
उत्तर प्रदेशच्या अलीगड जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या संजयला सहा महिन्यांपूर्वी क्षयरोग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्या उपचारांसाठी तो जिल्हा रुग्णालयात जात असे. मात्र लॉकडाऊनमुळे त्याला जिल्ह्याच्या ठिकाणी जाता आले नाही. त्यामुळे उपचारांअभावी त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती संजयच्या एका नातेवाईकाने दिली.