नवी दिल्ली -मागील एका आठवड्यात उत्तरप्रदेशात महिला अत्याचारांच्या १३ घटना घडल्या. मात्र, यावर विधानसभेचे विशेष सत्र बोलावून चर्चा करण्यास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे वेळ नसल्याची टीका काँग्रेस नेत्या आणि उत्तरप्रदेशच्या सचिव प्रियंका गांधी यांनी केली आहे.
'मागील एका आठवड्यात राज्यात महिला अत्याचाराच्या क्रूर अशा १३ घटना घडल्या. यापैकी चार घटनांमध्ये पीडितेने एकतर आत्महत्या केली, किंवा तिला मारण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे. महिला सुरक्षेची ही अवस्था अस्वस्थ करणारी आहे. मुख्यमंत्र्यांना विधानसभेचे विशेष सत्र बोलविण्यास वेळ नाही. मात्र, त्यांचे 'फोटो सेशन' सुरू आहे, असे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशातील गोंड जिल्ह्यात तीन बहिणी झोपलेल्या असताना त्यांच्यावर अॅसिड हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेनंतरही प्रियंका गांधींनी योगी सरकारवर टीका केली होती. योगी सरकार गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
दरम्यान, उत्तर प्रदेशात हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले होते. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे असून आरोपी अटकेत आहेत. हाथरस प्रकरण नीट हाताळले नसल्यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. पीडितेचा मृतदेहावर कुटुंबीयांच्या परस्पर अंत्यसस्कार करण्यात आले. तसेच हाथरस जिल्ह्याच्या सीमा पोलिसांनी सील केल्या होत्या. माध्यम आणि राजकीय नेत्यांना जिल्ह्यात प्रवेश करण्यापासून बंदी घातली होती.