नवी दिल्ली - लखनौ येथे हिंदू समाज पक्षाचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची भरदिवसा त्यांच्या कार्यालयातच गळा चिरून हत्या करण्यात आली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आरोपींना सोडणार नाही. त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार, असे म्हटले आहे.
मी तिवारी यांच्या परिवाराची भेट घेईल. हे प्रकरण तपासासाठी एसआईटीला सोपवले आहे. याचबरोबर मी या प्रकरणाविषयी पुर्ण माहिती घेणार आहे. या प्रकारच्या घटना सहन नाही केल्या जाऊ शकत. आरोपींना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा दिली जाणार, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
काय प्रकरण ?
लखनौ येथे हिंदू समाज पक्षाचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची शुक्रवारी भरदिवसा त्यांच्या कार्यालयातच गळा चिरून हत्या करण्यात आली. हल्लेखोर थेट कमलेश तिवारी यांना भेटायला गेले. त्यांनी तिवारी यांच्याशी जवळपास अर्धा तास संवाद साधला. संभाषणादरम्यान कमलेश तिवारी यांनी दोघांनाही चहा पाजला. यावेळी त्यांनी सेवकाला मसाला आणि सिगारेट आण्यासाठी पाठवले. तो परत येईपर्यंत हल्लेखोर तिवारींना ठार मारून फरार झाले होते. दरम्यान आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. कमलेश यांनी २०१५ला केलेल्या एका भडकाऊ भाषणाचा राग मनात धरुन या आरोपींनी कमलेश यांचा खून केला.
कमलेश तिवारी कोण होते?
हिंदु महासभेचे माजी नेते कमलेश तिवारी यांनी जानेवारी २०१७ मध्ये हिंदु समाज पक्षाची स्थापना केली. तिवारी यापूर्वी हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. कमलेश तिवारी यांनी प्रेषित मुहम्मद यांच्याशी संबंधित वादग्रस्त टीका केली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लागू करण्यात आला होता. अलीकडेच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने त्यांच्याविरूद्ध एनएसए रद्द केले होते.