लखनऊ - उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये मंगळवारी एक विशेष घटना पहायला मिळाली. भाजप आमदार नंद किशोर गुर्जर यांनी काही सहकारी आमदारांसोबत मिळून आपल्याच सरकारविरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर विरोधी पक्षातील आमदारांनीदेखील या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला. राज्य विधानसभेमध्ये आपले म्हणणे मांडण्याची संधी न मिळाल्यामुळे त्यांनी आंदोलन सुरु केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गुर्जर हे आपल्या मतदारसंघातील काही अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाबाबत विधानसभेमध्ये बोलणार होते. त्यावेळी सभापतींनी त्यांना याबाबत बोलण्यास मनाई केली. त्यानंतर गुर्जर यांनी आपल्याच पक्षाविरोधात आंदोलन सुरु केले. विशेष म्हणजे, भाजपच्या ७० आमदारांनी गुज्जर यांना पाठिंबा देत आंदोलन सुरु केले. मात्र, विरोधी पक्षातील आमदारांच्या म्हणण्यानुसार, भाजपचे साधारणपणे १५० आमदार हे गुर्जर यांच्या समर्थनार्थ आंदोलन करत होते.
त्यानंतर जेव्हा समाजवादी पक्षाचे आमदारही गुर्जर यांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभागी झाले, तेव्हा सभापतींनी विधानसभेचे त्या दिवशीचे कामकाज स्थगित केले. त्यानंतर संध्याकाळी भाजप आमदारांनी विधानसभेच्या लॉबी भागामध्ये आपल्या आमदारांची बैठक घेतली. तसेच, विधानसभेचे कामकाज स्थगित झाल्यानंतरही, दोन्ही बाजूंचे काही आमदार आपल्या जागांवरती बसून राहिले.
आश्वासनानंतर आंदोलन मागे..
सभापती हृदय नारायण दिक्षित यांनी आमदारांशी बोलून, या मुद्यावर आज (बुधवार) सभागृहात चर्चा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सर्व आमदारांनी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र, आजही यावर काही तोडगा निघाला नाही, तर आपण पुन्हा आंदोलन करू असा इशाराही या आमदारांनी दिला.
दरम्यान, याप्रकरणी चौकशी करण्यासाठी भाजपने वरिष्ठ आमदारांची एक समिती नेमली आहे.