नवी दिल्ली - उन्नाव प्रकरणातील आरोपी कुलदीप सिंह सेंगर याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने त्याला याप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाच्या निर्णयाला आणि त्याला देण्यात आलेल्या शिक्षेला त्याने आव्हान दिले आहे.
२०१७ साली एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात कुलदीप सेंगर हा मुख्य आरोपी होता. सीबीआय आणि पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपींना जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली होती. याप्रकरणी आरोप दाखल झाल्यानंतर भाजप आमदार असलेल्या सेंगरला पक्षातून निलंबीत करण्यात आले होते.
काय आहे प्रकरण ?
जून २०१७ मध्ये नोकरी मागण्यास गेल्यावर कुलदीप सेंगर याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला होता. तक्रार दाखल केल्यानंतर सेंगर आणि त्याच्या माणसांकडून पीडितेच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे तरुणीने सांगितले होते. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांच्या गाडीचा अपघात झाला होता. त्यामध्ये पीडितेची काकू आणि मावशीचा जागीच मृत्यू झाला. यापैकी पीडितेची काकू ही या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होती.
हा अपघात सेंगरनेच घडवून आणल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला होता. खटल्यात सीबीआयने कुलदीप सेंगर, त्याचा ड्रायव्हर आणि इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने निकाल देत, कुलदीप सेंगरला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा दिली होती. तसेच, पीडीतेला नुकसान भरपाई म्हणून २५ लाख रूपये देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते.
हेही वाचा : निर्भया प्रकरण: 'डेथ वॉरंट'ला स्थगिती देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार