नवी दिल्ली - उत्तर प्रदेश कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी शनिवारी उन्नाव बलात्कार पीडिताच्या समर्थनार्थ स्वाक्षरी अभियानामध्ये भाग घेतल्याबद्दल लखनौच्या मुलींचे आभार मानले आहेत.
'उन्नाव की बेटी' या मोहिमेमध्ये लखनौमधील सर्व मुलींनी सहभाग घेतला. याबद्दल मी त्यांची आभारी आहे. बलात्कार केल्यानंतर अपराधींच्या मनामध्ये कुठल्याच प्रकारची भिती नसते. त्यांच्या या भावनेला आपण सर्वजण एकत्र येऊन आव्हान देऊ शकतो', असे त्या म्हणाल्या आहेत.
यापूर्वी प्रियंका गांधी यांनी बाराबांकी येथील एका मुलीने उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणी विचारलेल्या प्रश्नावरून टि्वट करत भाजपवर हल्लाबोल केला होता. जर एखादी मोठी व्यक्ती गुन्हा करते. तेव्हा त्याच्याविरुद्धचा आमचा आवाज ऐकला जाईल का? बाराबांकीच्या मुलीने विचारलेला हा प्रश्न उत्तर प्रदेशमधील प्रत्येक महिला आणि मुलीच्या मनात आहे. या प्रश्नाचे भाजपने उत्तर द्यावे असे टि्वट प्रियंका गांधी यांनी केले होते.
काय आहे प्रकरण?
देशभर गाजलेल्या उन्नाव सामूहिक बलात्कार घटनेतील पीडिता आणि तिचे कुटुंब रायबरेली येथील कारागृहात बंद असलेल्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी जात होते. त्यावेली त्यांच्या कारला भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात पीडितेची काकू आणि मावशीचा जागीच मृत्यू झाला. यापैकी पीडितेची काकू ही या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होती. तर, वकिलाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आरोपी कुलदीप सेंगर सध्या तुरुंगात असून तो तेथूनच आपल्या आणि आपल्या मुलीभोवती हे संपूर्ण कारस्थान रचत असल्याचे पीडितेच्या आईने म्हटले आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश धर्मेश शर्मा यांना उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीची जबाबदारी सोपवली आहे.