नवी दिल्ली - रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी (वय ६५) यांचे आज निधन झाले. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून ते दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. ११ सप्टेंबरला त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कर्नाटकच्या बेळगाव मतदारसंघाचे ते प्रतिनिधीत्व करत होते. त्यांच्या पाठीमागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
एम्समध्ये वरिष्ठ वैद्यकीय तज्ञ्जांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज सायंकाळी त्यांची प्रकृती अधिकच बिघडली, उपचार सुरू असताना ८ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. भाजपसह काँग्रेस नेत्यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, जयराम रमेश यांनी ट्विट करून त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. 'तुमचे हास्य नेहमी आठवणीत राहील, ही बातमी ऐकून खूपच दु:ख झाले.' असे ट्विट रमेश यांनी केले आहे.