नवी दिल्ली - देशाचे आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या आई स्नेह लता गोयल यांचे रविवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. याबाबत हर्षवर्धन यांनी टि्वट करून माहिती दिली आहे. त्या 89 वर्षाच्या होत्या. स्नेह लता गोयल यांच्या इच्छेनुसार त्यांच नेत्रदान करण्यात आले आहे.
'मला हे सांगताना अत्यंत दु:ख होत आहे की, पृर्थ्वीवरील माझी सर्वात प्रिय व्यक्ती, माझ्या आईचे आज निधन झाले. ती 89 वर्षीय होती. आज सकाळी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तीच्या जाण्याने माझ्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कोणीच भरून काढू शकत नाही, असे टि्वट वर्धन यांनी केले आहे.
'आईच्या इच्छेनुसार त्यांचे नेत्रदान दिल्ली येथील एम्समध्ये करण्यात आले आहे. आज दुपारी तीन वाजता मी त्यांचे पार्थिव मौलाना आझाद मेडिकल कॉलेज प्रशासनाकडे सोपवणार आहे. त्याचे देहदान आपल्या सर्वांना समाजासाठी जगण्याची नेहमीच प्रेरणा देईल, असे टि्वट हर्षवर्धन यांनी केले.
दरम्यान, राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा दिवस 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या काळात साजरा केला जातो. राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याची सुरूवात 1985 साली झाली. लॅन्सेट ग्लोबल हेल्थ जर्नलच्या मते जगभरात अंदाजे 3.6 कोटी लोक आंधळे आहेत आणि एकट्या भारतात ही संख्या जगाच्या एक चतुर्थांश म्हणजे 88 लाख इतकी आहे. दृष्टीदोष ही एक सर्वात मोठी समस्या आहे.
डॉ. हर्षवर्धन भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते असून ते आजवर अनेक वेळा दिल्ली विधानसभेवर निवडून आले आहेत. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी चांदनी चौक मतदारसंघामधून काँग्रेसचे विद्यमान खासदार व केंद्रीय मंत्री कपिल सिबल ह्यांचा 2 लाखांहून अधिक मताधिक्याने पराभव केला होता.