नवी दिल्ली -केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी रविवारी आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकांवर मोठे वक्तव्य केले होते. मनोज तिवारी यांनाच मुख्यमंत्री करणार असे ते म्हणाले. मात्र, त्यानंतर त्यांनी पुन्हा युटर्न घेत मुख्यमंत्रीपदाबाबत अद्याप नाव ठरवण्यात आले नसल्याचे म्हटले आहे.
हरदीप पुरी यांनी घेतला यु-टर्न
'दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी मनोज तिवारी यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. काहीही झाले तरी, आम्ही मनोज तिवारी यांना मुख्यमंत्री करणारच', असे हरदीप सिंह यांनी म्हटले. यावेळी जय श्री राम' आणि 'अब की बारी मनोज तिवारी' , अशा घोषणा ही कार्यकर्त्यांनी दिल्या.
मात्र, त्यानंतर हरदीप सिंह पुरी यांनी युटर्न घेत आपल्या वक्तव्यावर टि्वट करून स्पष्टीकरण दिले आहे. 'मनोज तिवारी यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढवणार असून मुख्यमंत्री पदासाठी अद्याप नाव ठरवण्यात आले नाही', असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपमध्ये अंतर्गत वाद असल्यामुळे त्यांनी स्पष्टीकरण दिले असावे, असे बोलले जात आहे.
सध्या मनोज तिवारी हे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. त्यांच्यावर दिल्ली प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच मनोज तिवारी हे 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडूण आले आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणूक २०१५ -
दिल्ली विधानसभा निवडणूक २०१५ ही भारताच्या दिल्ली राज्यातील विधानसभा निवडणुक होती. ७ फेब्रुवारी २०१५ रोजी एकाच फेरीत घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये विधानसभेमधील सर्व ७० जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. मागील निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावर आलेले व केवळ ४९ दिवस टिकलेले अरविंद केजरीवाल ह्यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीने या निवडणुकीत ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळवून सपशेल बहुमत मिळवले. भाजपला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले तर काँग्रेसला खाते उघडण्यात देखील अपयश आले. ७० पैकी ६३ जागांवरील काँग्रेस उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. भारताच्या निवडणूक इतिहासामधील हा सर्वात दमदार विजयांपैकी एक मानला जातो.