जयपूर - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी जर सीएए कायद्याचा अभ्यास केला असेल तर मी राहुल बाबांना आव्हान करतो की, त्यांनी कोणत्याही ठिकाणी चर्चा करायला यावं. जर कायद्याचा अभ्यास केला नसेल, तर मी इटालियन भाषेत कायदा अनुवादित करुन पाठवतो, असे शाह म्हणाले. राजस्थानमधील जोधपूर येथे सीएए समर्थनार्थ आयोजित सभेत शाह बोलत होते.
सीएएवर चर्चा करण्यासाठी यावं; पाहिजे तर इटालियन भाषेत अनुवाद करतो, शाहांचे राहुल गांधींना आव्हान - Amit Shah in Jodhpur
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
देशात नरेंद्र मोदी यांची सत्ता असून कोणालाही घाबरण्याची गरज नाही. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदूवर अत्याचार झाला. त्यामुळे ते पाकिस्तानातून भारतामध्ये आले. देशातील सर्व शरणार्थींना नागरिकत्व दिले जाणार आहे. काँग्रेस सीएए कायद्याचा विरोध करत असून केंद्र सरकारवर टीका करत आहेत. जवाहरलाल नेहरू यांनी पाकिस्तानमधून आलेल्या हिंदू आणि शीख शरणार्थींना नागरिकत्व देऊ, असे म्हटले होते. मग नेहरू जातीयवादी होते का, असा सवाल शाह यांनी केला.
यापूर्वी सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व हे मुद्दे एकत्रित करुन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यात येत आहे, असा आरोप शाहांनी काँग्रेसवर केला होता. एवढेच नाही तर सुधारित नागरिकत्व कायद्यातील कोणत्या तरतूदीमुळे नागरिकत्व जाईल, हे सिद्ध करुन दाखवा, असे आव्हानच त्यांनी राहुल गांधी यांना दिले होते.