भुवनेश्वर- भारत २०२१ पर्यंत अवकाशामध्ये अंतराळवीर पाठवणार आहे. गगनयान मोहिमेअंतर्गत अवकाशात मानव पाठवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. भारतासाठी ही मोहीम अती महत्त्वाची असून त्याद्वारे देशाची तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रातील प्रगती अधोरोखित होणार आहे. आयआयटी भुवनेश्वर येथे ८ व्या दिक्षांत समारंभावेळी इस्रो प्रमुख के. सिवन बोलत होते.
२०२० पर्यंत भारत मानवरहीत यान अवकाशात पाठवणार आहे. तर दुसरे मानवरहित यान २०२१ च्या जुनपर्यंत अवकाशात पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर डिसेंबर २०२१ पर्यंत भारत अवकाशात मानव पाठवणार आहे. इस्रोमधील प्रत्येकजण या मोहिमेवर काम करत आहे, असे सिवन म्हणाले. गगनयान मोहिमेवर चांद्रयान २ मोहिमेचा परिणाम होणार नाही, असेही सिवन म्हणाले.