लखनऊ - माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या उमा भारती यांनी हाथरस प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 'आपण आत्ताच राम मंदिराची पायाभरणी केली असून देशात रामराज्य आणण्याचा दावा केला आहे. मात्र, या प्रकरणात पोलिसांच्या संशयपूर्ण कारवाईमुळे सरकार आणि भाजपाची प्रतिमा मलिन झाल्याचे त्या म्हणाल्या आहेत.
उमा भारती यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच माध्यम प्रतिनिधी आणि विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांना हाथरसला जाऊ देण्याची विनंती त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे.
उमा भारती यांनी ट्विटमध्ये लिहले आहे की, 'मी हाथरस घटनेबद्दल पाहिले. तुम्ही(योगी आदित्यनाथ) या प्रकरणात योग्य कारवाई करत असाल म्हणून मी सुरुवातीला काही बोलले नाही. मात्र, ज्या प्रकारे पोलिसांनी पीडित कुटुंब आणि गावाची घेराबंदी केली आहे', त्यावरून अनेक शंका उपस्थित होत आहेत.
'पीडिता एका दलित परिवारातील मुलगी होती. खुप घाईघाईत पोलिसांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले, आणि आता पोलिसांनी पीडित परिवार आणि गावाची घेराबंदी केली आहे. मला समजते त्यानुसार असा कोणताही नियम नाही, की विशेष तपास पथकाद्वारे चौकशी सुरू असताना परिवाराला कोणी भेटू शकत नाही. उलट तपासावरच संशय व्यक्त केला जाऊ शकतो'.
तुम्ही स्वच्छ प्रतिमेचे प्रशासक आहात. मी तुम्हाला विनंती करते की, माध्यम प्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांना पीडितेच्या कुटुंबाला भेटू द्यावे. जर मी कोरोना पॉझिटिव्ह नसते तर मी सुद्धा त्या गावातील पीडित परिवाराशी बोलत बसले असते. एम्समधून सुटी मिळाल्यानंतर मी हाथरस पीडितेच्या कुटुंबियांची नक्की भेट घेणार आहे, असे त्या म्हणाल्या.
उमा भारती यांना कोरोनाची लागण झाली असून उत्तराखंडातील ऋषिकेशमधील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तेथून त्यांनी ट्विटरद्वारे हाथरस प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.