लखनौ - मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज(शनिवारी) अयोध्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपचे कान टोचले. आम्ही भाजपला सोडलंय, हिंदुत्वाला नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. हिंदुत्व आणि भाजप या दोन गोष्टी वेगळ्या असल्याचे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर भाजप शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. सावरकरांच्या मुद्द्यावरूनही भाजपने शिवसेनेला सभागृहात कोंडीत पकडले होते. सीएए, एनपीआर आणि एनआरसीवरूनही सरकारची भूमिका स्पष्ट करण्यास भाजप शिवसेनेवर दबाव आणत आहे. आजच्या अयोध्या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी शिवसेनेकडून राम मंदिराला १ कोटींचीं मदतीची घोषणा केली. ही वेळ साधत त्यांनी हिंदुत्वाचे श्रेय घेण्यावरून भाजपला फटकारले.