हैदराबाद - लॉकडाऊनच्या काळात बाहेर फिरणाऱ्या लोकांना घरात ठेवण्यासाठी पोलीस त्यांच्या काठीचा पुरेपूर वापर करत आहेत. काही प्रमाणात हे सर्व ठीकदेखील आहे, मात्र हैदराबादमधील दोन पोलिसांनी हे करताना कोणतेही तारतम्य न बाळगता, तरुणांना अगदी रक्त येईपर्यंत मारहाण केली. यामुळे या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. हैदराबाद पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी मंगळवारी याबाबत आदेश दिले.
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. यांपैकी एक मीर चौक पोलीस ठाण्यामधील कॉन्स्टेबल आहे, तर दुसरा गोळकोंडा पोलीस ठाण्यामधील होमगार्ड आहे. शहर पोलीस प्रमुखांनी यांच्या निलंबनाबाबत ट्विट करत माहिती दिली. हैदराबाद शहर पोलीस हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी काम करत आहे. मात्र, मीर चौक पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल सी. एच. सुधाकर यांच्या गैरवर्तनामुळे एका सामान्य नागरिकाला इजा झाली आहे. त्यामुळे, त्यांना निलंबित करण्यात येत आहे.