नवी दिल्ली -नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज आंदोलन स्थळी दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यात एकाने आत्महत्या केली आहे. तर दुसऱ्या शेतकऱ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. आत्महत्त्या करणारा शेतकरी दरियाव सिंह हे जींदच्या सिंहवाला गावचे रहिवासी आहेत. हृदय विकाराच्या झटक्याने मरण पावलेले सुखमिंदर सिंह (वय 60 ) हे दुरकोट जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
दरियाव सिंह यांनी एका झाडाला प्लस्टिकच्या दोरीने गळफास लावत आत्महत्त्या केली आहे. सकाळी आंदोलक शेतकऱ्यांना त्याचा मृतदेह झाडाच्या फांदीला लटकलेला आढळून आला. घटनास्थळी एक सुसाईड नोट देखील आढळली आहे. भारतीय किसान युनियन जिंदाबाद! हे मोदी सरकार चर्चेसाठी तारीखेवर तारीख देत आहे. हे काळे कायदे कधी रद्द होतील, याचा काहीच अंदाज नाहीये. जोपर्यंत हे काळे कायदे रद्द होत नाहीत. तोवर आम्ही मागे हटणार नाही, असं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहलंय. पोलिसांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेहाला फांदीवरुन खाली काढलं आणि पोस्टमार्टमसाठी सिव्हील हॉस्पिटलला पाठवला आहे.