जम्मू - सियाचीनमध्ये पंधरा दिवसात दुसऱ्यांदा हिमस्खलनाची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन जवान हुतात्मा झाले आहेत. हे जवान 18 हजार फुट उंचीवर गस्त घालत होते. जगातील सर्वात अधिक उंचीवर असलेली युद्धभूमी अशी सियाचीनची ओळख आहे.
लडाखमधील सियाचीनमधील हिमनदीरमध्ये 18 हजार फुटांवर जवान शनिवारी सकाळी गस्त घालत होते. त्यावेळी हिमस्खलनाची दुर्घटना घडली होती, असे संरक्षण दलाचे प्रवक्ते राजेश कालिया यांनी सांगितले. हिमस्खलन मदत पथकाने घटनास्थळ शोधून काढत तातडीने सर्व जवानांना तेथून बाहेर काढले. हिमस्खलनात अडकेल्या जवानांना मदत करण्यासाठी हेलिकॉप्टरही पोहोचले होते. आरोग्य पथकाने दुर्घटनेत सापडलेल्या जवानांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यामध्ये दोन जवान हुतात्मा झाले.