नवी दिल्ली- ट्विटर इंडिया ही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जम्मू आणि काश्मीरचा भाग हा पीपल्स रिपब्लिक ऑफ चीनचा भूभाग असल्याचे ट्विटर इंडियाने त्यांच्या टाईमलाईनवर दाखविले आहे. त्यामुळे भारतीय नेटिझन्समधून ट्विटरवर कारवाईची मागणी होत आहे.
ऑबझर्व्हर रिसर्च फांउडेशनचे (ओआरएफ) कांचन गुप्ता यांनी ट्विटर इंडियाने भारतीय नकाशाबाबत केलेली घोडचूक सर्वप्रथम उजेडात आणली आहे. ट्विटरने जम्मू आणि काश्मीर हा भाग चीनचा असल्याचे जाहीर करण्याचे ठरविले आहे का? हे भारतीय कायद्याचे उल्लंघन नाही का? अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्या कायद्यापेक्षा मोठ्या आहेत का? असे ट्विट गुप्ता यांनी करत दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांना टॅग केले आहे. ट्विटर इंडियाने जम्मू आणि काश्मीर चीनचा असल्याचे दाखविल्याने भारतीयांनी ट्विटर इंडियनवर कारवाई करण्याची सरकारकडे मागणी समाज माध्यमातून करण्यास सुरुवात केली आहे.