नवी दिल्ली - हिंदुत्व चळवळ ही १९४७च्या मुस्लीम जातीयवादाचे प्रतिबिंब आहे. या चळवळीचा विजय म्हणजे भारतीय विचारांचा विनाश, असे विधान करत काँग्रेस नेते शशी थरूर यांनी हिंदुत्व ही धार्मिक नव्हे तर, राजकीय तत्त्वप्रणाली असल्याचे सांगितले.
हिंदू भारत हा काही हिंदू विचारधारेचा नसून ते संघी हिंदुत्व राज्य असेल, आणि तो एक वेगळा देश असेल, असे मत थरूर यांनी आपले पुस्तक, 'द बॅटल ऑफ बिलाँगिंग'मध्ये व्यक्त केले आहे. या पुस्तकाचे आज प्रकाशन झाले. अलेफ बूक कंपनीद्वारे प्रकाशित या पुस्तकात थरूर यांनी हिंदुत्व तत्वप्रणाली, नागरिकत्व कायद्याचे वाभाडे काढले आहे. हे दोन्ही घटक मूलभूत भारतीयत्वाला आव्हान असल्याचे मत थरूर यांनी आपल्या पुस्तकात व्यक्त केले आहे.
देशाला धर्मावर आधारित बनवू नये
ज्या भारतावर आपण सर्व प्रेम करतो, त्या भारताचे जतन व्हावे, हा देश धार्मिक राज्य होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. तसेच, हिंदुत्व चळवळीला अटकाव करण्यासाठीच भारताचा जन्म झाला होता, असे प्रतिपादन शशी थरूर यांनी केले.
हिंदू पाकिस्तानबाबत सरकारच्या प्रयत्नांना विरोध
पुस्तकात 'हिंदू पाकिस्तान' या वादग्रस्त विषयासंबंधी एक अध्यायही आहे. त्यात हिंदू पाकिस्तान बनवण्यासाठी विद्यमान सरकारकडून होत असलेल्या प्रयत्नांचा आपण कठोरपणे विरोध केला असून, हिंदू पाकिस्तानसाठी स्वतंत्रता चळवळ चालवली गेली नव्हती, व राज्यघटनेत ही भारतीय कल्पना अंतर्भूतही नाही, असे मतही थरूर यांनी व्यक्त केले. बहुतांश भारतीयांना सर्वसमावेशकता आवडत असून त्यांना असहिष्णू एक धर्मी पाकिस्तानातील नागरिक ज्या अवस्थेत राहात आहेत, त्या अवस्थेत त्यांना राहायचे नसल्याचे देखील थरूर म्हणाले.
हेही वाचा-पुलावामाचे राजकारण करणाऱ्यांना देश कधी विसरणार नाही; त्यांचा बुरखा फाटला आहे - मोदी