नवी दिल्ली -उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. हाथरसमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. माध्यमांना रिपोर्टींग करण्यापासून रोखण्यात येत आहे. तसेच तृणमूल नेत्यांच्या शिष्टमंडळालाही उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखले आहे.
हाथरसला पोलीस छावणीचे स्वरूप; तृणमूलच्या खासदाराला धक्काबुक्की, माध्यमांना प्रवेशबंदी - हाथरस प्रकरण लेटेस्ट न्यूज
तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यासह पक्षाच्या शिष्टमंडळाला आज पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून रोखण्यात आले. कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत पोलिसांकडून राजकीय नेत्यांना रोखण्यात येत आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना भेटू दिले नाही. त्यांच्यापाठोपाठ आज तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यासह पक्षाच्या शिष्टमंडळाला पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून रोखले. कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत पोलिसांकडून राजकीय नेत्यांना रोखण्यात येत आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत. नेते, कार्यकर्ते आणि कोणत्याही संघटनेला हाथरसमध्ये प्रवेश देण्यात येत नसून तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
तथापि, हाथरसमध्ये वाल्मिकी समाजाशी निगडीत सफाई मजूर संघाने कामबंद आंदोलनाची हाक दिली. तर, समाजातील काही लोकांनी हाथरसमध्ये रस्त्यावर पोलिसांवर दगडांचा वर्षाव केला. त्यानंतर पोलिसांकडून नागरिकांवर लाठीचार्ज करण्यात आला. संपूर्ण हाथरस शहरात तणावपूर्ण वातावरण आहे. पीडितेच्या मृत्यूनंतर रोष वाढल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन सदस्यीय एसआयटीची स्थापना केली आहे. सोबतच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना लवकरात लवकर शिक्षा देण्याचे निर्देशही दिले आहेत.