नवी दिल्ली -कोरोना काळात पाच महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली मेट्रो पुन्हा सुरू होणार आहे. उद्यापासून (7 सप्टेंबर) येलो लाइनवरील मेट्रो सुरू करण्यात येणार आहे. यावेळी कोरोनाबाबतची सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. याबाबत पाहणी करण्यासाठी दिल्लीचे परिवहनमंत्री कैलाश गहलोत यांनी आज (दि. 6 सप्टें.) राजीव चौक मेट्रो स्थानकाला भेट दिली.
फक्त दोनच गेट उघडणार -
राजीव चौक मेट्रो स्थानकातील फक्त दोन गेट उघडण्यात येणार आहेत. 7 नंबर गेटमधून प्रवासी येऊ शकतात व बाहेर पडण्यासाठी 6 नंबरचा गेट सुरू राहणार आहे. कैलाश गहलोत यांनी निरीक्षणावेळी सोशल डिस्टंसिंगसाठी कोणत्या सुविधा आहेत, लिफ्ट तसेच सॅनिटायझरबाबतची पाहणी केली.
सॅनिटायझेशनवर भर -
निरीक्षणावेळी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना परिवहनमंत्री म्हणाले की, मेट्रो प्रवासादरम्यान मास्क, थर्मल स्क्रीनिंग व सामाजिक अंतर या सर्व बाबींवर लक्ष दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात उद्या (दि. 7 सप्टें.) फक्त येलो लाइनवरील मेट्रो सुरू होईल. मेट्रोचे डबे सॅनिटाइझ करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सकाळी व सायंकाळी 4-4 तासांसाठी मेट्रो चालवली जाईल, अशी माहिती कैलाश गहलोत यांनी दिली.