लखनौ - जगप्रसिद्ध ताजमहालची भुरळ कोणाला पडणार नाही? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेदेखील यास अपवाद नाहीत. ते सपत्निक आज ताजमहाल पाहायला जाणार आहेत. ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यात विशेष म्हणजे, ट्रम्प यांचे वास्तव्य असलेल्या कालावधीत आग्रा रेल्वे स्थानकात एकही रेल्वे प्रवेश करणार नाही.
ट्रम्प यांचे खेरिया विमानतळावर दुपारी 4.45 वाजता आगमन होणार आहे. ते सायंकाळी 7 च्या सुमारास परतणार आहेत. या कालावधीत आग्रा रेल्वे स्थानकामध्ये एकाही रेल्वे गाडीचे आगमन होणार नाही. सर्व रेल्वे गाड्या बाहेरच थांबविण्यात येणार आहेत. विमानतळापासून ताजमहालपर्यंतच्या प्रवासादरम्यान रेल्वेच्या आवाजाचा ट्रम्प यांना त्रास व्हायला नको, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.