नवी दिल्ली - एक जूनपासून सुरू होणाऱ्या रेल्वेसाठी आज (गुरुवार) पासूनच आरक्षण सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. २१ मे रोजी सकाळी दहा वाजेपासून ही आरक्षण प्रक्रिया सुरू होणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एक जूनपासून देशातील २०० प्रवासी रेल्वेगाड्यांची वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालय आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एकत्रितरित्या याबाबत निर्णय घेतला आहे. देशभरातील प्रवासी रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठीचा हा पहिला टप्पा असणार आहे.
स्थलांतरीत कामगार तसेच, साधारण प्रवाशांसाठी सोय म्हणून या रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्या उपलब्ध असल्या, तरी श्रमिक विशेष रेल्वेही सुरू राहणार आहेत. तसेच, याव्यतिरिक्त इतर रेल्वे गाड्या (मेल/एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि सब-अर्बन) बंदच राहणार आहेत. यावेळी सुरू करण्यात येणाऱ्या गाड्यांची यादी तसेच, याबाबतची नियमावलीही मंत्रालयाने जाहीर केली आहे.
काय असतील नियम?
गाड्यांमध्ये 'जनरल' डबा नसेल.
तिकिटांचे दर हे पूर्वीप्रमाणेच राहतील.
गाड्यांचे मार्ग, वेळ आणि थांबे पूर्वीप्रमाणेच राहतील.
केवळ ऑनलाईन आरक्षण करता येणार आहे.
एआरपी (अॅडव्हान्स रिझर्वेशन पिरिएड) हा ३० दिवसांचा राहील.
केवळ तिकीट नक्की झालेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाईल.
रेल्वेमध्ये जाण्यापूर्वी प्रवाशांची स्क्रीनिंग अनिवार्य राहील. केवळ कोरोनाची लक्षणे न दिसणाऱ्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी मिळेल.
चार प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना, तसेच ११ प्रकारच्या रुग्णांना मिळणारी सवलत लागू होईल.
नियोजित ठिकाणी पोहोचल्यानंतर प्रवाशांना त्या-त्या राज्यामधील किंवा केंद्रशासित प्रदेशामधील लागू असलेल्या आरोग्यविषयक नियमांचे पालन करावे लागेल.
रेल्वे गाड्यांमध्ये चादर, पडदे किंवा बेडशीट अशा सुविधा पुरवण्यात येणार नाहीत.
मुंबईहून सुटणाऱ्या गाड्यांची यादी पुढीलप्रमाणे..
- सीएसएमटी (मुंबई) - भुवनेश्वर (कोनार्क एक्सप्रेस)
- लोकमान्य टिळक (टी) - दरभंगा (दरभंगा एक्सप्रेस)
- लोकमान्य टिळक (टी) - वाराणसी (कामायणी एक्सप्रेस)
- सीएसएमटी - वाराणसी (महानगरी एक्सप्रेस)
- सीएसएमटी - गडग
- सीएसएमटी - केएसआर बेंगळुरू (उदयन एक्स्प्रेस)
- सीएसएमटी - हैदराबाद (हुसैन सागर एक्सप्रेस)
- बांद्रा - जोधपूर (सूर्यनगरी एक्सप्रेस)
- मुंबई सेंट्रल - अहमदाबाद (कर्णावती एक्सप्रेस)
- मुंबई एलटीटी - तिरुवअनंतपुरम सेंट्रल (नेत्रावती एक्सप्रेस)
- मुंबई सेंट्रल - जयपूर
- बांद्रा - गाझियापूर
- लोकमान्य टिळक (टी) - पाटलीपुत्र
जनशताब्दी गाड्या..
- बांद्रा - गोरखपूर (अवध एक्सप्रेस)
- बांद्रा - मुझफ्फरपूर (अवध एक्सप्रेस)