- भंडारा- कोविड रुग्णालयात रुपांतरित करण्यात आलेल्या अशोका हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून एका कोरोना रुग्णाने उडी घेतली आहे. या घटनेत रुग्णाचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्याला उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर बोलू असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सविस्तर वाचा-भंडाऱ्यात कोरोनाबाधिताने रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून घेतली उडी
- मुंबई - राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. राज्यात आज कोरोनावाढीला थोडासा दिलासा मिळाला आहे. राज्यात १५ हजार ७३८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १२ लाख २४ हजार ३८० झाली आहे. राज्यात २ लाख ७४ हजार ६२३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आज राज्यात ३४४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
सविस्तर वाचा-दिवसभरात नवीन रुग्णांपेक्षा डिस्चार्ज दुप्पट; 32 हजार रुग्ण कोरोनामुक्त
- वर्धा - जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जन्मदात्या पित्यानेच पोटच्या दोन मुलींवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यातील एक मुलगी गर्भवती आहे. दोन्ही मुली नागपुरात आजीकडे गेल्या असताना ही घटना उजेडात आली. आर्वी पोलिसांनी नराधम पित्याला अटक केली आहे.
सविस्तर वाचा-धक्कादायक : जन्मदात्या बापानेच केला दोन मुलींवर अत्याचार
- बंगळुरु - संसदेत विरोधकांच्या गोंधळात रविवारी शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार ही दोन विधेयके मंजूर झाली. याविधेयकांचा देशभरातून विरोध करण्यात येत आहे. अभ्यासक व विश्लेषक योगेद्र यादव यांनी या विधेयकांना विरोध दर्शवला असून 'हे विधेयके देशाच्या इतिहासात मैलाचा दगड नाही, तर शेतकऱ्यांच्या गळयातले लोढणे आहे, अशी टीका त्यांनी केली.
सविस्तर वाचा-'कृषी विधेयके मैलाचा दगड नव्हे, तर शेतकऱ्यांच्या गळयातलं लोढणं'
- सोलापूर -शहर व जिल्ह्यात पुकारलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनास हिंसक वळण लागले. काही ठिकाणी किरकोळ दगडफेक झाली आहे. तर काही ठिकाणी फेरीवाल्यांच्या फळांच्या गाड्या पलटी केल्या आहेत.
सविस्तर वाचा-सोलापुरात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण, दुकानांसह एटीएम फोडले
- मुंबई - मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगितीविरोधात सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारकडून याचिका दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वाचा-मराठा आरक्षण : अंतरिम स्थगितीविरोधात राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका
- मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केल्यानंतर मराठा समाजातर्फे आज सोलापुरात आंदोलन केले जात आहे. मराठा आरक्षण आणि आंदोलन या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने ज्येष्ठ विधिज्ञांसोबत मराठा आरक्षणप्रश्नी वर्षा निवासस्थानी बैठक बोलावली आहे. राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि विधिज्ञ यांच्यासोबत चर्चा करून मराठा आरक्षणप्रश्नी आजच मुख्यमंत्री ठोस निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे.
सविस्तर वाचा-मराठा आरक्षणप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ विधिज्ञांची बैठक
- मुंबई -मुंबई महापालिकेत गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. या सत्ताकाळात आधी मित्रपक्ष असलेल्या भाजपाने राज्यात सत्ता समीकरणे बदलल्यावर पालिकेत विरोधकांची भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते पदावर दावा करत, भाजपाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पालिकेच्या नियमाप्रमाणे काँग्रेसला देण्यात आलेले विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडेच राहणार की, भाजपाकडे जाणार याबाबतचा निकाल आज लागला आहे. न्यायालयाने भाजपाचा दावा फेटाळत काँग्रेसकडेच विरोधी पक्ष नेते पद राहणार असल्याचा निर्णय दिला आहे.
सविस्तर वाचा-पालिकेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडेच; उच्च न्यायालयाने भाजपाचा दावा फेटाळला
- ठाणे - भिवंडीच्या धामणकर नाका, पटेल कंपाऊंड परिसरात असलेली एक ३ मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १००हून अधिक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफ आणि टीडीआरएफची टीम दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे. ही घटना आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. राज्य शासनाकडून मृतांच्या नातेवाइकांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून दु:ख व्यक्त केले आहे.
सविस्तर वाचा-Live : भिंवडीत ३ मजली इमारत कोसळली; ५ बालकांसह १० जणांचा मृत्यू, गुन्हा दाखल
- नवी दिल्ली- ४ जी सेवा देऊन भारत संचार निगमला पुनरुज्जीवित करण्याचे वक्तव्य २०१८ या वर्षी माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले होते. ही सेवा अद्याप सुरू झालेली नाही. तसेच, केंद्रसरकारच्या एका आवडत्या कंपनीमुळे भारत संचार निगमला आययूसीसंबंधी (इंटर युजेस चार्जेस) ५ हजार कोटींचे नुकसान झाले, असा दावा खासदार अरविंद सावंत यांनी आज लोकसभेत केला.
सविस्तर वाचा-सरकारच्या आवडत्या कंपनीमुळे बीएसएनएलचे कंबरडे मोडले
- सातारा -फलटण तालुक्यात चित्रिकरण सुरू असलेल्या 'आई माझी काळूबाई' या मालिकेच्या सेटवरील 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचाही त्यामध्ये समावेश असून त्यांच्यावर सातारा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
सविस्तर वाचा-ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर व्हेंटिलेटरवर; प्रकृती चिंताजनक