नवी दिल्ली - आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) अद्ययावत करण्याची प्रक्रिया राबवलेले आयएएस अधिकारी प्रतीक हाजेला यांची तातडीने मध्य प्रदेशात बदली करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. एनआरसीचे समन्वयक हाजेला हे या बदलीच्या ठिकाणी जास्तीत जास्त काळ राहतील, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटले आहे.
न्यायालयाने हाजेला यांची तातडीने बदली करण्याचे आदेश सरकारला दिले आहे. सरकारचे वकील अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी 'असा निर्णय घेण्याचे काही कारण आहे का?' असा प्रश्न विचारला. तेव्हा 'कोणताही आदेश कारणाशिवाय दिला जात नाही,' असे सरन्यायाधीश गोगोई म्हणाले. मात्र, या आदेशात त्यांनी कारण नमूद केलेले नाही. आसाममधील अनेकांच्या दृष्टीने ही घटना चकित करणारी आहे.
४८ वर्षीय हाजेला हे आसाम-मेघालय कॅडरचे १९९५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्याकडे आसाममधील नागरिकांची सुधारित यादी तयार करण्याचे मोठे काम सोपवण्यात आले होते. या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रियेदरम्यान अनेक जातीयवादी आणि भाषिक विभाजनाशी संबंधित मोठी वादाची स्थिती निर्माण झाली. मात्र, ही सर्व जबाबदारी अत्यंत हुशारीने हाताळू शकणारे एक तांत्रिकदृष्ट्या सक्षम अधिकारी म्हणून हाजेला यांच्याकडे पाहिले जात होते.