नवी दिल्ली - सोनियां गांधी यांच्या निवासस्थानी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात होत असलेल्या आंदोलनांसंदर्भात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी या नेत्यांनी राजधानी दिल्लीसह देशभरात होत असलेल्या आंदोलनांविषयी तसेच सध्याच्या परिस्थितीविषयी चर्चा केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, ए. के. अँटनी, अहमद पटेल, ज्योतिरादित्य सिंधिया, शक्तीसिंग गोहिल यांच्यासह इतर अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते.
माध्यमांशी बोलताना ज्येष्ठ नेते आनंद शर्मा म्हणाले, "प्रत्येकाने या सरकारच्या वागणूकीविरोधात उभे राहिले पाहिजे. हे सरकार तरुणांचा आवाज दडपण्यासाठी प्रशासनाचा वापर करत आहे. हा केवळ एक राजकीय मुद्दा नसून राष्ट्रीय मुद्दा आहे" मोदी सरकारने आधी अर्थव्यवस्थेला उतरती कळा लावली आणि आता भारताची सामाजिक बनावट उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी, देशात जे घडत आहे ते दु:खद आहे. तसेच, ते बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारसरणीच्या विरोधात आहे, असे मत व्यक्त केले आहे. शांततेत निषेध करणार्या लोकांवर हिसांचार करणे अत्यंत दुर्दैवी आहे, अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईचा निषेध नोंदवला आहे.