चंदीगढ :शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी गुरुवारी केंद्राच्या शेतकरी धोरणाविरोधात आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र, ही केवळ शेतकऱ्यांना भुलवण्यासाठी असलेली खेळी असल्याचे मत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केले आहे. शिरोमणी अकाली दल वर्षानुवर्षे अशा युक्त्या वापरत आल्याचेही ते यावेळी म्हणाले.
राजीनामा देण्यासारख्या युक्त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना फसवण्याची शिरोमणी अकाली दलाची चाल आहे. ही चाल यशस्वी होणार नाही, कारण केंद्रात अकाली दल एनडीए सरकारमध्ये भाजपसोबतच आहे, हे सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांनाही माहिती आहे. हरसिमरत यांचा राजीनामा देण्याचा निर्णय हा खूपच उशीरा घेण्यात आल्याचेही ते म्हणाले. यापूर्वीच त्यांनी या विधेयकाविरोधात आवाज उठवला असता, तर कदाचित हे विधेयक मंजूरही झाले नसते, असे ते म्हणाले.