पाटणा - केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटण्याच्या दिघा घाटावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. पासवान यांचे गुरुवारी (8ऑक्टोबर) दिल्लीच्या फोर्टीस रुग्णालयात निधन झाले होते. शुक्रवारी सकाळी त्यांचे पार्थिव हवाईदलाच्या विशेष विमानाने पाटण्यात आणण्यात आले.
रामविलास पासवान अनंतात विलीन; दिघा घाटावर झाले अंत्यसंस्कार - last rites on paswan
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पार्थिवावर आज दिघा घाटावर अंत्यसंस्कार पार पडले आहेत. याआधी सकाळी आठ वाजल्यापासून त्यांचे पार्थिव बोरिंग रस्त्यावरील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
पार्थिव पाटण्याला आल्यानंतर सर्वप्रथम ते विधानसभेच्या आवारात नेण्यात आले. या ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री नितीश कुमार यांसह अन्य बड्या नेत्यांनी याठिकाणी उपस्थिती लावली. यानंतर पासवान यांचे पार्थिव लोकजनशक्ती पक्षाच्या मुख्यालयात आणण्यात आले. या ठिकाणी देखील सामूहिक श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज सकाळी पासवान यांचे पार्थिव बोरिंग रस्त्यावर स्थित त्यांच्या निवासस्थानी अंतिमदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दुपारी पासवान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. अनेक नेते यावेळी उपस्थित होते.