चेन्नई -तामिळनाडूत गाजत असलेल्या तुतिकोरीनमधील पिता-पुत्राच्या मृत्यूचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज(बुधवारी) हातात घेतला. सीबीआयकडे तपास देण्यात वेळ जाईल, तोपर्यंत पुराव्यांची अफरातफर होऊ नये म्हणून मद्रास उच्च न्यायालायाने तपास घाईघाईने गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. दरम्यान, गुन्हे शाखेने आज आणखी पाच पोलिसांची चौकशी केली आहे.
गुन्हे शाखेकडून मागील काही दिवसांपासून तपास सुरु होता. आता या प्रकरणाचा सगळा तपास सीबीआयच्या हातात आला आहे. लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तुतिकोरीनमधील पिता-पुत्राला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, पोलीस कोठडीतील छळामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप पोलिसांवर आहे. या प्रकरणी राज्यात संतापाची लाट पसरली असून पोलिसांना आरोपी ठरवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिता-पुत्र कोठडीतील मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचे विशेष पथक राज्यात दाखल झाले आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सुचनेनुसार कोठडीतीली मृत्यू प्रकरणी सीबीआयने आरोपांनुसार दोन गुन्हे दाखल केले आहेत, असे सीबीआयचे प्रवक्ते आर. के गौर यांनी सांगितले.