गेल्या महिन्यापासून चीनने भारताविरोधात सीमेवर कुरघोड्या करण्यास सुरुवात केली. गलवान व्हॅली आणि पॅन्गाँन्ग लेक वर चीनने आपला दावा केला. यानंतर ६ जूनला दोन्ही देशांतील लष्कराच्या लेफ्टनंट जनरल पदावरील अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली. यानंतर ९ तारखेला देखील बैठक घेण्यात आली. लडाख प्रांताच्या पूर्वेला असणाऱ्या चीनच्या चुशूल-मोल्दो भागात ही भेट झाली. उभयतांनी सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला. दरम्यान, चीनने सीमावर्ती पर्यतीय भागात मोठ्या प्रमाणात सैन्य आणि आर्टिलरी तैनात केली होती. चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या 'ग्लोबल टाइम्स' या वृत्तपत्रातून भारताविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये करण्यात आली होती. शांतता कायम ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठका पार पडत होत्या. मात्र, आता सीमेवर दोन्ही सैन्यादरम्यान चकमक सुरू झाल्याचे चित्र आहे. चिनने या आधी देखील दोन्ही देशांतील सीमा कराराचे उल्लंघन केले आहे. आता चकमक सुरू झाल्याने दोन्ही देशांतील तणाव निवळण्या ऐवजी वाढण्याचे संकेत आहेत.
जाणून घ्या भारत आणि चीन दरम्यान १९६२ च्या युद्धानंतर झालेल्या चकमकींची माहिती....
२० ऑक्टोबर १९६२ : चीनने अनपेक्षितपणे चर्चेचा मार्ग धूडकावून भारतावर हल्ला केला. ८० हजार चीनी ट्रूप्सने भारताच्या सीमावर्ती भागात घुसखोरी केली. दोन्ही देशांमध्ये मोठ्या युद्धाला तोंड फुटले. अखेर २१ नोव्हेंबवरला चीनने युद्धबंदीची घोषणा केली. यामध्ये भारतीय सैन्याची मोठ्या प्रमाणात हानी झाली.
१९६७ -भारत चीन युद्धानंतर पाच वर्षांनी भारतीय सैन्याने चीनच्या सैन्याला धूळ चारली. यामध्ये जवळपास ८० भारतीय सैनिकांना वीरमरण आले. तर, ३०० ते ४०० चीनी सैनिक मारले गेले. सिक्कीम राज्यातील नथु-ला पास जवळ झालेल्या या लढाईत भारतीय सैन्याचा विजय झाला. याचे रुपांतर सिक्कीम स्टॅन्डऑफ मध्ये झाले.